आडसाली ऊस लागवड : १०० टन उत्पादन आणि अधिक रिकव्हरी

 आडसाली ऊस म्हणजे आर्थिक समृद्धी

महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आडसाली ऊस लागवड ही केवळ एक लागवड पद्धत नसून, अधिक उत्पादन, उत्कृष्ट साखर उतारा (Recovery) आणि जास्त आर्थिक नफा मिळवून देणारे प्रभावी तंत्रज्ञान आहे. जुलै ते ऑगस्ट अखेरपर्यंत केली जाणारी आडसाली लागवड ऊसाला तब्बल १६ ते १७ महिन्यांचा वाढीचा कालावधी उपलब्ध करून देते. या कालावधीत ऊसाला दोन पूर्ण पावसाळ्यांचा लाभ मिळतो. त्यामुळे ऊसाची वाढ जोमदार होते, कांड्या जाड, लांब आणि वजनदार तयार होतात, तसेच ऊस पूर्णपणे पक्व झाल्यामुळे त्यातील साखरेचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढते.

आजही पश्चिम महाराष्ट्रात आडसाली उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु मराठवाडा आणि विदर्भासह महाराष्ट्रातील इतर अनेक भागांमध्ये आडसाली ऊस लागवड जवळपास होतच नाही. परिणामी अनेक शेतकऱ्यांना एकरी १०० टन उत्पादनाचे उद्दिष्ट गाठता येत नाही, तसेच कारखान्यांमध्ये साखर उतारा (रिकव्हरी) देखील तुलनेने कमी राहतो.

सध्या काही ठिकाणी ११ ते १२ महिन्यांतच ऊस तोडण्याची पद्धत वाढत आहे. परंतु अपूर्ण वाढ झालेला, पूर्णपणे न पक्व झालेला ऊस तोडल्यामुळे ऊसाचे वजन कमी मिळते, उत्पादन घटते आणि साखरेचे प्रमाणही कमी राहते. यामुळे शेतकऱ्याला कमी वजनामुळे आर्थिक नुकसान होते, तर कारखान्याला कमी रिकव्हरीमुळे साखर उत्पादनात तोटा सहन करावा लागतो. म्हणजेच, ही परिस्थिती शेतकरी आणि साखर कारखाना या दोघांसाठीही दुहेरी नुकसान करणारी ठरते.

मराठवाडा आणि विदर्भात पावसाळा काहीसा उशिरा सुरू होतो, हे वास्तव आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, त्यांनी आडसाली ऊस लागवडीचा अवश्य विचार करावा. योग्य नियोजन आणि पाण्याची उपलब्धता असल्यास या भागातही आडसाली ऊसातून उत्कृष्ट उत्पादन आणि अधिक आर्थिक परतावा निश्चित मिळू शकतो. यासाठी साखर कारखान्यांनीदेखील आडसाली लागवडीला प्रोत्साहन देणे, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आणि दर्जेदार बेण्याची उपलब्धता करून देणे ही काळाची गरज आहे.

 

आडसाली ऊस का देतो अधिक उत्पादन?

आडसाली ऊसाला वाढीसाठी १६ ते १७ महिन्यांचा कालावधी मिळत असल्यामुळे त्याची मुळव्यवस्था अधिक मजबूत होते. ऊसाची प्रत्येक कांडी पूर्ण विकसित होते आणि अन्नसाठा भरपूर प्रमाणात तयार होतो. दोन पावसाळ्यांमुळे जमिनीतील ओलावा आणि नैसर्गिक वाढीची प्रक्रिया अधिक प्रभावी होते. परिणामी ऊस अधिक वजनदार होतो आणि उत्पादनात लक्षणीय वाढ दिसून येते.

याशिवाय नोव्हेंबर ते जानेवारी या थंड वातावरणात ऊसाची तोडणी होत असल्याने साखरेचे संचयन अधिक होते. त्यामुळे अनेक कारखान्यांमध्ये १३ ते १४ टक्क्यांपर्यंत रिकव्हरी मिळते. जास्त रिकव्हरी म्हणजे कारखान्याचा फायदा आणि त्याचबरोबर शेतकऱ्यालाही अधिक दर मिळण्याची संधी.

 

१०० टन उत्पादनाची सुरुवात बेणे निवडीपासूनच होते

संत तुकाराम महाराजांनी सांगितलेले "शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी" या एका ओळीत संपूर्ण शेतीचे विज्ञान दडलेले आहे. जर बेणे शुद्ध असेल...तर उत्पादन उत्कृष्ट येणारच. म्हणून बेणे निवडताना कधीही तडजोड करू नका.

आधुनिक कृषी विज्ञानदेखील हेच सांगते की, भरघोस उत्पादनाचा पाया हा दर्जेदार आणि निरोगी बेण्यात असतो.

लागवडीसाठी नेहमी प्रमाणित (Certified) बेणे मळ्यातील ९ ते ११ महिन्यांचे निरोगी बेणे निवडावे. या करिता मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, सातारा व वसंतराव शुगर केन इन्स्टिट्यूट, मांजरी बु||. पुणे येथील फौंडेशन बेणे वापरून बेणे मळा वाढवावा.

 

मधल्या भागातील टिपऱ्याच सर्वोत्तम का?

अनेक शेतकरी ऊसाच्या वरच्या (वाड्याकडील) किंवा खालच्या (बुडख्या कडील) भागातील टिपऱ्या वापरतात. मात्र ही पद्धत वैज्ञानिकदृष्ट्या योग्य नाही.

वरचा भाग कोवळा असल्यामुळे त्यातील डोळे पूर्ण विकसित झालेले नसतात. तर खालचा भाग अतिपक्व असल्यामुळे त्याची वाढ संथ होते.

म्हणून लागवडीसाठी फक्त मधल्या भागातील दोन डोळ्यांच्या टिपऱ्याच वापराव्यात. या टिपऱ्यांमध्ये अन्नसाठा अधिक असतो, उगवण उत्कृष्ट होते आणि सुरुवातीपासूनच पीक जोमदार वाढते.

 

टिपऱ्या पाडताना या चुका टाळा

दोन डोळ्यांच्या टिपऱ्या तयार करताना त्या नेहमी लाकडी फळी किंवा ओंडक्यावरच पाडाव्यात. हातात धरून टिपऱ्या पाडल्यास डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते. व्यवस्थित टिपऱ्या पडल्या जात नाहीत. ३ – ४ डोळ्याची टिपऱ्या पडल्या जातात .

याचवेळी प्रत्येक टिपरीची तपासणी करून कांडी किडीचा प्रादुर्भाव असलेल्या, खराब डोळ्यांच्या किंवा रोगट टिपऱ्या वेगळ्या काढाव्यात. निरोगी बेणे हीच भरघोस उत्पादनाची पहिली अट आहे.

 

बेणे प्रक्रिया – यशाची गुरुकिल्ली

बेणे प्रक्रिया न करता लागवड करणे म्हणजे सुरुवातीलाच रोगांना निमंत्रण देणे होय.

यासाठी १०० लिटर पाण्यात ५ किलो खडा चुना (किंवा कळीचा चुना) आणि ५०० ग्रॅम कार्बेन्डाझिम बुरशीनाशक मिसळून द्रावण तयार करावे. दोन डोळ्यांच्या टिपऱ्या कांद्याच्या पोत्यात भरून त्या १५ मिनिटे या द्रावणात बुडवाव्यात.

या प्रक्रियेमुळे बुरशीजन्य रोगांचा धोका कमी होतो, उगवण सुधारते आणि सुरुवातीपासूनच पीक अधिक जोमदार वाढते.


यशस्वी आडसाली लागवडीची चार सुवर्णसूत्रे

✔ प्रमाणित आणि ९ ते ११ महिन्यांचे निरोगी बेणे निवडा.

✔ फक्त मधल्या भागातील दोन डोळ्यांच्या टिपऱ्या वापरा.

✔ टिपऱ्या लाकडी फळीवरच पाडा आणि रोगट किंवा किडग्रस्त टिपऱ्या वेगळ्या करा.

✔ बेणे प्रक्रिया करूनच लागवड करा.


निष्कर्ष : आडसाली ऊस हीच भविष्यातील शाश्वत दिशा

आज ऊस शेतीसमोर उत्पादन खर्च वाढणे, हवामानातील अनिश्चितता आणि कमी नफा ही मोठी आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत आडसाली ऊस लागवड ही केवळ पर्याय नाही, तर अधिक उत्पादन, जास्त रिकव्हरी आणि अधिक नफा मिळवून देणारी सिद्ध पद्धत आहे.

शेतकऱ्यांनी, साखर कारखान्यांनी आणि कृषी तज्ज्ञांनी एकत्र येऊन आडसाली लागवडीला चालना दिली, तर मराठवाडा, विदर्भ आणि महाराष्ट्रातील इतर भागांमध्येही एकरी १०० टनांपेक्षा अधिक उत्पादन, उत्कृष्ट साखर उतारा आणि ऊस शेतीची आर्थिक शाश्वतता साध्य होऊ शकते.

लक्षात ठेवा... १०० टन उत्पादनाची सुरुवात खतांपासून होत नाही; ती योग्य बेणे निवडण्यापासून होते.

 

विजयकुमार सरूर

M.Sc. Agro-chemicals & Pest Management

7972815345



Comments

Popular posts from this blog

मिट्टी में गोबर मिलाने से जैविक गतिविधियों में होने वाले वैज्ञानिक परिवर्तन

जल संरक्षण कोई अभियान नहीं—यह मानव सभ्यता की संस्कृति है